नवी दिल्ली - वेगाने वृद्धीदर करणारे एमएसएमई उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या स्थापनादिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.
देशातील ६.३३ कोटी एमएसएमई उद्योग देशाच्या नॉमिनल जीडीपीत ३० टक्के योगदान देत आहेत. तर निर्यातीत ६० टक्के एमएसएमईचे योगदान असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
हेही वाचा-सोन्याच्या दरात ३५८ रुपयांची घसरण; चांदी १५१ रुपयांनी महाग
पुढे शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोनाच्या संकटाने अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला होता. मात्र, एमएसएमई हे सध्या आर्थिक प्रगती करत आहेत. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये उत्पादन क्षेत्र आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे. भारताला जागतिक मूल्यवर्धित साखळीचा भाग करण्यासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) लाँच करण्यात आली आहे. तसेच रोजगार वाढविण्यासाठी मनुष्यबळ बाजारपेठेत सुधारणा केल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी दिली.
हेही वाचा-ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भांडवलीकरण करण्याची गरज-शक्तिकांत दास