मुंबई - येत्या पाच वर्षात खादी उद्योग १० हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडणार असल्याचा विश्वास खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले. चालू वर्षात ५ हजार कोटींचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ते लॅक्मे फॅशन वीक विंटर व फेस्टिव इडिशनच्या कार्यक्रमात बोलत होते.
विनय कुमार सक्सेना म्हणाले, जग हे स्वयंचलित पद्धतीकडे उत्पादनाकडे वळत आहे. अशा वेळी खादी हे मोजक्या हातमाग उत्पादनापैकी एक आहे. भविष्यात केवळ खादी उद्योग तरणार असल्याचे सक्सेना यांनी सांगितले.
विनय कुमार सक्सेना म्हणाले, गेल्या चार वर्षात खादी उद्योगाने सरासरी २८ टक्के वृद्धीदर गाठला आहे. तर २००४ ते २०१४ दरम्यान ६.१८ टक्के वृद्धीदर गाठला होता. सूत गिरण्या दररोज १२ हजार मीटर कापडाचे उत्पादन करत आहेत. खादीमधून केवळ रोज १२ मीटर सूत कातण्यात येतो. २००४ ते २०१४ दरम्यान खादी उद्योगाची ८८९ कोटींची उलाढाल होती. यामध्ये वाढ होवून गेल्या चार वर्षे ३ हजार २१५ कोटींची उलाढाल झाली आहे.
लॅक्मेचा आठवडाभर कार्यक्रम असताना तिसऱ्या दिवशी शाश्वत फॅशन ही संकल्पना राबविण्यात आली. यामध्ये विविध डिझायनरने शाश्वत फॅब्रिक्सचे कल्केशन सादर केले. यामध्ये अनुज भुतानी, पल्लवी धयानी आणि गौरव खानजीओ यांचा समावश आहे. या डिझायनरनी केव्हीयआसीबरोबर संयुक्तरित्या फॅशनचे कपडे तयार केले. हे कपडे विविध मॉडेलने रॅम्पवर घालून सादरीकरण केले. खादी हा भारताचा वारसा आहे. हा वारसा टिकविण्यासाठी अनेक डिझायनर कार्यक्रमात सहभागी झाले.