नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा विकासदर (जीडीपी) ४.७ टक्के नोंदविण्यात आला आहे. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केली आहे. हा गेल्या सात वर्षातील जीडीपीचा नीचांक आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत किंचित सुधारणा झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या विकासदराची (जीडीपी) ऑक्टोबर ते डिसेंबरअखेर ४.७ टक्के नोंद झाली आहे. यापूर्वीच्या तिमाहीत ४.५ टक्के एवढा विकासदर होता.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा ५.१ टक्के विकासदर नोंदविण्यात आला आहे. तर याच कालावधीत मागील आर्थिक वर्षात विकासदर ६.३ टक्के होता.
हेही वाचा-बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचे पेट्रोल-डिझेल १ एप्रिलपासून महागणार
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात ५ टक्के एवढा विकासदर राहिल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांचे हिरवे कोंब दिसत असल्याचे आज गुवाहाटीमध्ये म्हटले होते.