नवी दिल्ली - देशाच्या उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत डिसेंबरमध्ये सुधारणा झाली आहे. नवी कामे ( वर्क ऑर्डर) मिळाल्याने जुलैनंतर पहिल्यांदाच उत्पादन वाढले आहे. तसेच उत्पादन क्षेत्रात नोकर भरती सुरू झाल्याचे आयएचएस मर्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय अहवालात म्हटले आहे.
डिसेंबरमध्ये कामकाजात सुधारणा झाली असली तरी वर्ष २०२० कडे कंपन्या सावधपणे पाहत आहेत. त्याचा नोकऱ्यांची निर्मिती आणि गुंतवणुकीवर परिणाम होवू शकतो, असे सर्वेमध्ये म्हटले आहे.
आयएचएस मर्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय नोव्हेंबरमध्ये ५१.२ होता. तर यामध्ये प्रमाण वाढून डिसेंबरमध्ये ५२.७ झाला आहे. ही उत्पादन क्षेत्रातील गेल्या दहा महिन्यातील सर्वात अधिक सुधारणा आहे.
मागणी वाढल्यानंतर मे महिन्यापासून उत्पादन वाढविल्याने कारखान्यांना फायदा झाला आहे. तसेच कच्च्या मालाची खरेदी आणि रोजगारामध्येही डिसेंबरमध्ये वाढ झाल्याचे आयएचएस मर्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी. लामा यांनी सांगितले.
हेही वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण: टाटा सन्सचे सर्वोच्च न्यायालयात अपिल
वर्ष २०१९ च्या शेवटच्या महिन्यात व्यवसाय विश्वसनीयतेचे प्रमाण हे गेल्या तीन वर्षात सर्वात कमी राहिल्याचे लिमा यांनी सांगितले. बाजारातील स्थितीवर वाटणाऱ्या चिंतेचे हे प्रतिबिंब आहे. त्यामुळे वर्ष २०२० च्या प्रारंभी नोकऱ्यांची निर्मिती आणि गुंतवणुकीवर परिणाम होवू शकतो, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. येत्या १२ महिन्यांत उत्पादनात वृद्धी होईल, असा सर्व्हेमध्ये अंदाज वर्तविला आहे. तर महागाईने गेल्या १३ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. कच्च्या माल आणि उत्पादन अशा दोन्ही गोष्टींचे दर वाढल्याचे किंमत निर्देशांकातून दिसून आले आहे.
हेही वाचा-ट्रायची प्रेक्षकांना नववर्षाची भेट : कमी पैशात दिसणार जादा प्रसारण वाहिन्या
काय आहे पीएमआय ?
उत्पादनाचा पीएमआय हा सलग २९ व्यांदा ५० अंशावरून अधिक राहिला आहे. पीएमआय हा ५० वरून अधिक होणे, हे उत्पादनातील वृद्धीचे निर्देशक आहे. तर पीएमआय हा ५० हून कमी झाल्यास उत्पादन खुंटल्याचे स्पष्ट होते.