महाबलिपूरम - व्यापारी आणि गुंतवणूक या मुद्द्यावर काम करण्यासाठी नव्या यंत्रणेची स्थापना करण्यात येणार आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये आज चर्चेदरम्यान सहमती झाली आहे. दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेची माहिती दिली. प्रादेशिक सहकार्य आर्थिक भागीदारीबाबत (आरसीईपी) भारताला वाटणाऱ्या चिंतेचे निराकरण करण्यात येईल, असे शी जिनपिंग यांनी आश्वासन दिल्याचे गोखले यांनी सांगितले. नियमावर आधारित असलेली जागतिक व्यापार व्यवस्था महत्त्वाची असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.
संरक्षणाबाबत सहकार्य वाढविण्याची गरजही शी जिनपिंग यांनी व्यक्त केल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली. भविष्याकडे भारत-चीनने पाहण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. तसेच दहशतवादाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर दोन्ही नेते सहमत झाले आहेत. अनौपचारिक बैठकीत काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाला नाही व चर्चा झाली नसल्याचे विजय गोखले यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांची गेली दोन दिवस समोरासमोर सुमारे साडेपाच तास चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधींच्या पातळीवरही चर्चा झाली आहे.