नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) ५ टक्के राहिल, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीडीपी हा ६.८ टक्के राहिला होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात जीडीपी हा गतवर्षीहून कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४.५ टक्के जीडीपी, तर दुसऱ्या तिमाहीत ५ टक्के जीडीपीची नोंद झाली आहे. हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपीचे कमी प्रमाण आहे. अशा स्थितीत चालू वर्षाचा जीडीपी कमी राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केला आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ४२० रुपयांची घसरण, 'हे' आहे कारण
अंदाजित जीडीपी काढण्यासाठी याचा करण्यात आला विचार-
- चालू वर्षातील पहिल्या सात महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीवरून अंदाजित जीडीपी काढण्यात आला आहे. तसेच खासगी कंपन्यांची सप्टेंबरच्या तिमाहीपर्यंतची कामगिरी आणि पिकाचे अंदाजित उत्पादन, केंद्रीय आणि राज्य सरकारचे खाते, रेल्वे प्रवासी आणि मालवाहू सेवा यांचा विचार करण्यात येतो.
- त्याचप्रमाणे नागरी विमान वाहतूक, बंदर वाहतूक आणि व्यापारी वाहनांची विक्री यांचाही अंदाजित आकडेवारीत विचार करण्यात येतो. ही आकडेवारी चालू वर्षातील पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीपर्यंतची घेण्यात येते.
- वस्तू व सेवा कर (जीएसटी) १ जूलै २०१७ ला देशभरात लागू झाल्यानंतर कररचनेत बदल झाला. त्यानंतर जीडीपीमध्ये जीएसटीचे संकलन आणि बिगर जीसीटीचे संकलन अशी महसुलाची वर्गवारी करण्यात येत आहे.
हेही वाचा-सरकारी बँकांची सेवा विस्कळित होण्याची शक्यता; उद्या कामगार संघटनांचा संप