नवी दिल्ली - देशाचे सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर दुसऱ्या तिमाहीत ५ टक्क्यावरून ४.२ टक्के होईल, अशी शक्यता एसबीआयने अहवालात व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर हा पूर्वीच्या अंदाजित ६.१ टक्क्यांऐवजी ५ टक्के राहिल, असेही एसबीआयने ( अहवालात म्हटले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्के विकासदर हा गेल्या सहा वर्षातील नीचांकी होता.
पहिल्या तिमाहीच्या ५ टक्क्यांवरून विकासदर दुसऱ्या तिमाहीत ४.२ टक्के होईल, असे आरबीआयने म्हटले आहे. वाहनांची कमी विक्री, विमान वाहतुकीचे कमी झालेले प्रमाण, मुख्य क्षेत्रांचे घटलेले उत्पादन दर या कारणांनी राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरावर परिणाम होईल, असे एसबीआयने अहवालात म्हटले आहे. याशिवाय बांधकाम आणि पायाभूत क्षेत्रात कमी झालेली गुंतवणूक यांचाही विकासदरावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा-अलिबाबाची एका दिवसात २ लाख ६६ हजार कोटींची उलाढाल; 'सिंगल्ज'दिवशी नोंदविला विक्रम
कृषी उत्पादन घटणार -
परतीचा लांबलेला पाऊस आणि पुरामुळे अनेक राज्यांतील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि पंजाब राज्याचा समावेश आहे. सर्वात मोठे तेलबिया उत्पादक राज्य असलेल्या मध्यप्रदेशमधील भुईमुगाला ३० ते ४० टक्के फटका बसला आहे. मध्यप्रदेशमधील सोयाबीनच्या ४० ते ५० टक्के पिकाला फटका बसला आहे. गुजरातमधील कापूस पिकाला ३० टक्क्यापर्यंत फटका बसला आहे.
पुर आणि पावसाने कृषी उत्पादनातील अग्रगण्य राज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पादन घटणार आहे. चालू वर्षात विकासदर हा घटून ५ टक्के राहिल, असे एसबीआयने अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्यावर आणखी एका जागल्याचा निशाणा
जागतिक संस्था एशियन डेव्हलपमेंट बँक, जागतिक बँक, ओईसीडी, भारतीय रिझर्व्ह बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आर्थिक वर्ष २०२० मधील भारताचा विकासदर पूर्वीच्या अंदाजाहून घटेल, असे यापूर्वीच म्हटले आहे.
जीडीपी म्हणजे काय ?
एखाद्या देशाचे ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (जीडीपी- ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत असते. जीडीपीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती कशी होते, याचे आकलन होवू शकते.