नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोरोनाच्या महासंकटात राज्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना मार्च 2020 साठी जीएसटीच्या मोबदल्यापोटी 13 हजार 806 कोटी रुपये वितरित केले आहे.
कोरोना महामारी आणि टाळेबंदीत राज्यांना मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्नाला मुकावे लागले आहे. अशा स्थितीत राज्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे. राज्यांना पहिल्या सहा महिन्यात मिळालेले जीएसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घसरले आहे. केंद्र सरकारने नुकतेच राज्यांना जीएसटी मोबदल्यापोटी 13 हजार 806 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
केंद्र सरकारने राज्यांना वर्ष 2019-20 साठी एकूण 1 लाख 65 हजार 302 कोटी जीएसटी मोबदलापोटी वितरित केले आहेत. तर वर्ष 2019-20 मध्ये 95 हजार 444 कोटी रुपयांचा कर संकलित केला आहे. वर्ष 2017-18 व 2018-19 मध्ये सरकारने संकलित केलेला कर हा राज्यांना दिलेल्या जीएसटी मोबदल्याहून अधिक होता.
महाराष्ट्राला 19 हजार 233 कोटी रुपये!
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये केंद्र सरकारने औद्योगिकीकरण झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकला सर्वाधिक जीएसटी मोबदला वितरित केला आहे. महाराष्ट्राला 19 हजार 233 कोटी रुपये, कर्नाटकला 18 हजार 628 कोटी रुपये, गुजरातला 14 हजार 801 कोटी रुपये, तामिळनाडूला 12 हजार 305 कोटी रुपये तर पंजाबला 12 हजार 187 कोटी रुपये वितरित केले आहेत.
काय आहे जीएसटी मोबदला?
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी मोबदला देण्यात येतो. एक देश व एक कर असलेली जीएसटी (वस्तू व सेवा कर) प्रणाली अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्र सरकारने राज्यांना नुकसान भरपाईपोटी पाच वर्षांपर्यंत मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्यांना दरवर्षी जीएसटी मोबदला देण्यात येतो.
दरम्यान, कोरोना आणि टाळेबंदीमुळे देशातील करसंकलनाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला राज्यांना जीएसटी मोबदला देताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.