नवी दिल्ली - जीएसटी मोबदला मिळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टीका केली आहे. जीएसटी मोबदलाचा प्रश्न आवश्यकता नसताना राजकीय केला जात असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मागील सरकारने राज्य व केंद्र सरकारमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार केले असा त्यांनी युपीए सरकारवर आरोप केला.
विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी जीएसटी मोबदला थकित असल्याने केंद्र सरकारवर टीका केली होती. जीएसटी मोबदलाबाबत केंद्र सरकार वचनबद्धता पाळत नसल्याचे राज्यांनी टीका केली होती. पाच तास चाललेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, की मागील सरकारने केंद्रीय विक्री कराचा (सीएसटी ) मोबदला देण्याचे वचन पाळले नव्हते. त्यामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरुवातीला जीएसटीच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला होता. जीएसटीच्या मोबदला मिळण्यावरून आज राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, त्याबद्दल राज्यांची आभारी आहे. सध्याच्या स्थितीबाबत केवळ काळजी आहे. तसेच मोबदला मिळण्याच्या प्रश्नाबाबत उत्तर शोधण्यासाठी चिंता आहे.
पश्चिम बंगालने सरकारवर केली होती टीका-
राज्यांना जीएसटी मोबदला देण्याची केंद्र सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पाळत येत नसल्याचा काही राज्यांनी बुधवारी आरोप केला. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना बुधवारी पत्र पाठवून जीएसटी मोबदला मिळण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पत्रात म्हटले, की सर्वात वाईट वाटणारी भीती खरी ठरत असल्याचे दिसत आहे. राज्यांना घटनात्मक हमी दिली असताना ती जबाबदारी केंद्र सरकारची नसल्याचे चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे. हे आश्चर्यकारक आहे.
दरम्यान, राज्यांना जीएसटी मोबदला देण्यासाठी जीएसटी परिषदेने कर्जाचा पर्याय सूचविला आहे. हे कर्ज राज्यांना आरबीआयकडून किंवा बाजारातून घेता येणार आहे.