नवी दिल्ली – भारतीय बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचे गुंतवणूक आणि वृद्धीदरावर परिणाम होत असल्याचे मत मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती व्ही. सुब्रमणियन यांनी व्यक्त केले. ते फिक्कीच्या 17 व्या वार्षिक भांडवली बाजार परिषेदत (सीएपीएएम2020) बोलत होते.
बँकिंग क्षेत्रापुढे प्रमाण आणि गुणवत्ता या दोन समस्या आहे. या दोन समस्यांमुळे विकासदर मंदावत असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती व्ही. सुब्रमणियन यांनी सांगितले. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले, की बुडित कर्ज आणि धोक्याबात नापसंती असल्याने गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम हा वृद्धीदर आणि मागणी कमी होण्यात झाला आहे. बँकिंग क्षेत्रातील प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मोठ्या कर्जदारांची गुणवत्ता चांगली नाही. त्यामुळे बँकांनी मोठ्या कर्जदारांना कर्ज देताना त्यांची वित्तीय स्थिती तपासली पाहिजे, असा सल्ला मुख्य आर्थिक सल्लागारांनी दिला.
देशाला मोठ्या बँकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील आघाडीच्या 100 बँकांपैकी भारताची केवळ एक बँक आहे. तर पहिल्या 100 मध्ये चीनच्या 18 वित्तीय संस्था आहेत.
सरकारी बँकांनी टाळेबंदीत ईसीएलजीएसमधून एमएसएमई उद्योगांना कर्ज दिले आहे. त्याव्यतिरिक्त कर्जाचे टाळेबंदीत कमी वाटप झाले आहे. सध्याच्या बँकिंग व्यवस्थेचा विचार करता देश मोठी अर्थव्यवस्था होवू शकत नाही. दरम्यान, आत्मनिर्भर भारताकरता भांडवली बाजाराची भूमिका या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर सुमारे चार टक्क्यांहूून अधिक घसरणार असल्याचा अंदाज फिच, इक्रा, मूडीज या पतमानांकन संस्थांसह जागतिक बँकेने अंदाज वर्तविला आहे.