हैदराबाद - कोरोना महामारीचा लेबर मार्केटवर झालेल्या विविधांगी परिणामांचे विश्लेषण आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) केले आहे. या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, २०२० च्या पहिल्या सहामाहीत जगभरातील कामाच्या तासांची संख्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा अत्यंत कमी झाली आहे, तर या वर्षाच्या उत्तरार्धात अत्यंत अनिश्चितता असेल. सरकारने जर ही परिस्थिती अत्यंत उत्तमप्रकारे हाताळली, तरीही देशाची व्यवस्था पूर्वपदावर यायला बराच कालावधी लागू शकतो. तसेच येत्या काळात देशातील अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका सर्वात जास्त आहे.
आयएलओच्या अहवालातील ‘कोविड-१९ आणि जगातील कामे’ या पाचव्या प्रकरणानुसार, २०२० सालच्या दुसर्या तिमाहीत जागतिक कामाच्या तासांत १४ टक्क्यांची घसरण झाल्याचे म्हटले आहे. १४ टक्के घट म्हणजे पूर्ण वेळ काम करणाऱ्या ४०० दशलक्ष लोकांनी नोकरी गमावण्यासारखे आहे. हा अंदाज आठवड्यात एकूण ४८ कामाचे तास गृहीत धरुन लावला आहे. मागील अहवालातील अंदाजाच्या तुलनेत ही घट १०.७ टक्क्यांनी (३०५ दशलक्ष नोकर्या) झाली आहे.
तसेच ही नवीन आकडेवारी मागील आठवड्यात बर्याच देशांची (विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची) दुर्दशा अधोरेखित करते. २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिका (१८.३ टक्के), युरोप आणि मध्य आशिया (१३.९ टक्के), आशिया आणि पॅसिफिक (१३.५ टक्के), अरब राष्ट्रे (१३.२ टक्के) आणि आफ्रिकेमध्ये (१२.१ टक्के) कामाचे तास वाया गेले आहेत. जगातील बहुतेक कामगार (९३ टक्के) हे अर्थव्यवस्था ठप्प झालेल्या देशांमध्ये राहतात. अमेरिकी लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
२०२० चा दुसरी सहामाही -
२०२० च्या उत्तरार्धात परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी या नवीन अहवालात तीन प्रकारच्या मॉडेलचा उल्लेख केला आहे. यामध्ये बेसलाइन, निराशावादी आणि आशावादी मॉडेलचा समावेश आहे. भविष्यात साथीच्या रोगावर नियंत्रण आणि सरकारचे योग्य धोरणा निवड, या दोन बाबींवरच दीर्घकालीन सकारात्मक परिणाम अवलंबून असतील, असेही या विश्लेषणात म्हटले आहे.
बेसलाइन मॉडेल – ज्यामध्ये चालू कामकाज, कामाच्या ठिकाणची निर्बंध हटवणे, उपभोक्ते आणि गुंतवणूक व्यवस्था पुन्हा सुरळीत करणे, अशा आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आणणाऱ्या बाबींचा समावेश यामध्ये केला आहे. तसेच २०१९ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत कामाच्या एकूण तासात ४.९ टक्क्यांची (१४० दशलक्ष पूर्ण वेळ नोकऱ्यांएवढे) घट होईल, असा अंदाज यामध्ये व्यक्त केला आहे.
निराशावादी मॉडेल- जगामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल आणि परिणामी पुन्हा एकदा निर्बंध लादावी लागतील, या शक्यतांचा समावेश निराशावादी मॉडेल मध्ये केला आहे. यामुळे खूपच धीम्या पद्धतीने परिस्थिती पूर्वपदावर येईल. परिणामी कामाच्या वेळात ११.९ टक्क्यांची (३४० दशलक्ष पूर्ण वेळ नोकऱ्यांएवढे) घसरण होईल.
आशावादी मॉडेल - सर्व व्यवस्था पटकन सुरळीत होईल, अशी परिस्थिती या प्रकारात गृहीत धरली आहे. यामुळे एकूण मागणी आणि नोकरीच्या निर्मितीत लक्षणीय वाढ होईल. त्याचबरोबर या वेगवान पुनर्प्राप्तीमुळे कामाचे तास गमावण्याचे प्रमाण १.२ टक्क्यांपर्यंत (३४ दशलक्ष पूर्णवेळ रोजगार ) असेल.
महिलांवर होणारा परिणाम..
महिला कामगारांना कोरोना महामारीचा सर्वाधिक असमान पद्धतीने फटका बसला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अलिकडच्या काही दशकात रोजगाराच्या बाबतीत जगाने जी लैंगिक समानता प्रस्थापित केली होती. ती पून्हा एकदा गमावली जाईल आणि रोजगार संबंधित लैगिंक असमानतेचा संघर्ष पून्हा एकदा तीव्र होईल, असा इशाराही या अहवालात दिला आहे.
त्यातल्या त्यात विविध आर्थिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कामगारांना कोविड-१९ चा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये निवास, अन्न, विक्री आणि उत्पादन आदी क्षेत्रांचा समावेश होतो. जगामध्ये काम करणाऱ्या एकूण महिला कामगारांपैकी जवळपास ५१० दशलक्ष (४० टक्के महिला कामगार) महिला कामगार, सर्वाधिक फटका बसलेल्या प्रमुख चार क्षेत्रांमध्ये काम करतात. हा आकडा पुरुष कामगारांच्या तुलनेत ३६.६ टक्के इतका आहे.
त्याचबरोबर ज्याठिकाणी महिलांचे उत्पन्न अगदी तुटपुंजे आणि संक्रमण किंवा प्रादुर्भाव होण्याचा धोका सर्वाधिक आहे. अशा घरगुती कामात, आरोग्य आणि सामाजिक सेवा क्षेत्रात महिलांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होते. तसेच अशा ठिकाणी त्यांना सामाजिक संरक्षण मिळण्याची शक्यताही अत्यल्प असते. या महामारीच्या अगोदर अस्तित्वात असलेली असमान आणि कमी परतावा देणारी व्यवस्थाही कोरोना काळात कोलमडून पडली आहे.
“पुढच्या आठवड्यात आयएलओ ‘कोविड-१९ आणि वर्ल्ड ऑफ वर्क’ या विषयावर उच्च स्तरीय जागतिक परिषदेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करणार आहे. मला आशा आहे की, या परिषदेत अभिनव कल्पना सादर करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तसेच शिकलेल्या धड्यांविषयी चर्चा करण्यासाठी विविध सरकारे, कामगार आणि कंपन्या या उपक्रमात सहभागी होतील. तसेच सर्वसमावेशक, न्याय्य आणि टिकाऊ रोजगाराच्या पुनर्निमितीसाठी एकत्रितपणे काम करण्याची ठोस योजना घेऊन येतील. यामुळे भविष्यात चांगल्याप्रकारे रोजगार निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आव्हान स्विकारले पाहिजे.” असे अवाहन आयएलओचे महासंचालक गाइ रायडर यांनी केले.