नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे भीषण चित्र समोर आले आहे. कोरोनाने देशातील 41 लाख तरुणांनी नोकऱ्या गमाविल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालात म्हटले आहे. बांधकाम आणि कृषी क्षेत्रातील सर्वाधिक कामगारांनी नोकऱ्या गमाविल्याचे आहेत.
भारतामध्ये महत्त्वाच्या सात क्षेत्रात तरुणांनी नोकऱ्या गमाविल्याचे आयएलओ आणि एडीबीच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे आशिया आणि पॅसिफिकमधील तरुणांसमोर रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोना महामारीचा 25 व त्याहून अधिक वर्षे वय असलेल्या तरुणांपेक्षा 15 ते 24 वयोगटातील तरुणांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा एडीबीच्या अहवालातून देण्यात आला आहे.
हा अहवाल ‘तरुणांचे आणि कोरोनाचे जागतिक सर्वेक्षणा’वरील मुल्यांकनावर आधारित आहे. यामध्ये विविध देशातील बेरोजगारीचे प्रमाण वेगवेगळे आहे. विविध देशातील सरकारने तातडीने, मोठ्या प्रमाणात आणि रोजगार निर्मिती होऊ शकणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अहवालामधून करण्यात आली आहे. तरुणांना शिक्षण आणि प्रशिक्षण चालू ठेवावे असेही अहवालामधून सूचविण्यात आले आहे.
एडीबी एनजीओचे प्रमुख ख्रिस मॉर्रीस म्हणाले, की आशियामध्ये कोरोनाच्या संकटानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य द्यावे. त्यामधून सर्वसमावेशक व शाश्वत प्रगती, सामाजिक स्थिरता होऊ शकते.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे देशात टाळेबंदी लागू केल्यानंतर विविध उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यातून देशातील नोकरी भरती आणि रोजगारावर परिणाम झाला आहे.