नवी दिल्ली - नोटांबदीच्या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नोटाबंदीबाबत घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मंदी हा नोटाबंदीचा सर्वात वाईट परिणाम असल्याचे मत ३३ टक्के लोकांनी व्यक्त केले. तर २८ टक्के लोकांच्या मते नोटाबंदीचे कोणतेही वाईट परिणाम नाहीत.
नोटाबंदीच्या निर्णयाबाबतचा सर्व्हे हा लोकलसर्कल्स या ऑनलाईन समुदायाकडून (कम्युनिटी) करण्यात आला. या सर्व्हेमध्ये देशभरातील ५० हजार लोकांनी सहभाग घेतला.
नोटाबंदीमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे नुकसान झाल्याचे सर्व्हेमधील ३२ टक्के लोकांना वाटते. नोटाबंदीमुळे काय फायदा झाला, असा प्रश्न सर्व्हेमधून विचारण्यात आला. यावर ४२ टक्के लोकांना कर चुकवेगिरी करणारे जाळ्यात आल्याचे वाटते. तर २५ टक्के लोकांनी नोटाबंदीचे पाऊल उचलण्याने काहीच फायदा झाला नसल्याचे सांगितले.
हेही वाचा-एसबीआयकडून ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात; कर्जाचे दर अंशत: स्वस्त
अर्थव्यवस्थेमधील काळ्या पैशांचे प्रमाण कमी झाल्याचे मत २१ टक्के लोकांनी व्यक्त केले. तर १२ टक्के लोकांना थेट प्रत्यक्ष करांच्या महसुलात वाढ झाल्याचे वाटते. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत.
हेही वाचा-मूडीजने घटविले देशाचे पतमानांकन; आर्थिक जोखीम वाढवित असल्याचे नोंदविले निरीक्षण
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय-
अर्थव्यवस्थेमधील काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी सरकारने नोटाबंदीचे पाऊल उचलले होते. त्यामुळे ५०० रुपये व १ हजार रुपयांच्या एकूण १५.४१ लाख कोटींच्या नोटा चलनातून बाद ठरल्या होत्या. त्यापैकी १५.३१ लाख कोटी रुपये हे परत चलनात आले आहेत. केवळ १० हजार कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेमध्ये परतले नाहीत.
नोटाबंदीनंतर नागरिकांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली होती. बँकेत पैसे जमा करणाऱ्या संशयितांना प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावल्या होत्या.