नवी दिल्ली - अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांच्या भारत दौऱ्यापूर्वी स्पर्धक कंपनी वॉलमार्टने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. वॉलमार्टने ५६ वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. हा कॉर्पोरेट पुनर्रचनेचा भाग असल्याचे वॉलमार्टने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजारासह निफ्टीचा विक्रमी उच्चांक; सोन्याच्या दरात घसरण
वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ क्रीश अय्यर म्हणाल्या, संस्था योग्य दिशेने जाण्यासाठी कॉर्पोरेट रचनेचा आढावा घेण्याची गरज असते. कामावरून काढण्यात आलेल्या ५६ अधिकाऱ्यांपैकी ८ अधिकारी हे वरिष्ठ पातळीच्या व्यवस्थापनामधील आहेत. तर ४८ अधिकारी मध्यम आणि त्याहून खालील स्तरावरील व्यवस्थापनाचे आहेत. त्यांना अधिक सवलती देवू केल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असे काही माध्यमांत वृत्त आले आहे. यावर विचारले असता अय्यर यांनी ती चुकीची व आधारहीन माहिती असल्याचे म्हटले आहे. वॉलमार्ट इंडियाने भारतात लक्षणीय गुंतवणूक केल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वॉलमार्टचे देशात २८ घाऊक विक्री केंद्र आहेत. अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-रतन टाटांविरोधातील अब्रुनुकसानीचा खटला नस्ली वाडिया यांनी घेतला मागे