चेन्नई – घरपोहोच अन्न देणाऱ्या स्विग्गी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चेन्नईमध्ये पैसे वाढवून मिळण्यासाठी आंदोलन केले आहे. कंपनीच्या नव्या धोरणामुळे एका डिलिव्हरीमागे केवळ 10 रुपये मिळत असल्याचा कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे. कोरोना महामारीचा फटका बसला असताना त्यात उत्पन्न कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चेन्नईच्या विविध भागात स्विग्गीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. बहुतांश उत्पन्न हे पेट्रोलसाठी खर्च करावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे प्रत्येक ऑर्डरमागे 35 ते 40 रुपये द्यावेत, अशी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे मागणी केली आहे.
स्विग्गीचे डिलिव्हरी कर्मचारी पिंटो राम यांनी त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या कठीण परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी एका ऑर्डरमागे 40 रुपये मिळत होते. पेट्रोलचे दर वाढले असतानाही सध्या एका ऑर्डरमागे 10 रुपये झाले आहेत. पूर्वी दिवसभरात आम्ही 800 रुपये कमवित होतो. सध्या, दिवसाला केवळ 200 रुपये मिळत आहेत. आम्ही मुलांना कसे जगवायचे? कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांचे काम थांबविले आहे.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणाऱ्या भत्त्यातही कपात झाली आहे. तर त्यांना ऑर्डर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करून केवळ 200 रुपये मिळत आहे. दिल्ली व मुंबईमधील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात आहे. मात्र, आम्हाला बोनस दिला जात नाही.
दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने कामाचे उद्दिष्ट पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. ते म्हणाले, की पूर्वी आम्हाला विश्रांतीसाठी थोडो वेळ मिळत होता. मात्र, आम्हाला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 12 तास काम करावे लागत आहे. पावसात काम केल्यास मिळणारा प्रोत्साहन भत्ता तसेच आठवड्याचा व मासिक प्रोत्साहनपर भत्ता बंद करण्यात आला आहे.