मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया घेवू शकते. त्यासाठी तयार केलेल्या पुनर्रचनेतील आराखड्यानुसार येस बँकेत जास्तीत जास्त १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक स्टेट बँक करू शकते. ही माहिती स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी आज दिली.
स्टेट बँकेने येस बँकेसाठी 'पुनर्रचना योजना आराखडा २०२०' तयार केला आहे. यामध्ये रणनीती गुंतवणूकदार बँक ही ४९ टक्के हिस्सा घेणार आहे. या रणनीती गुंतवणूकदार बँकेला भांडवली गुंतवणुकीनंतर किमान तीन वर्षापर्यंत २६ टक्क्यांहून कमी गुंतवणूक करता येणार नाही.
हेही वाचा-येस बँकेला भारतीय आयुर्विमा महामंडळही मदतीचा हात देणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना ३ एप्रिलपर्यंत केवळ ५० हजार रुपयापर्यंत रक्कम खात्यातून काढता येते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक येस बँकेवर प्रशासक म्हणून प्रशांत कुमार यांची नियुक्ती करणार आहे.