मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरच्या दरात १० बेसिस पाँईटने कपात केली आहे. त्यामुळे रेपो दराशी संलग्न नसलेले कर्ज स्वस्त होणार आहे. हे कर्जाचे व्याजदर १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने चालू वर्षात सहाव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. सणानिमित्त आणि सर्व प्रकारच्या ग्राहकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटने कपात केल्याचे एसबीआयने म्हटले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जाचा समावेश आहे. मात्र, ही कपात रेपो दराशी संलग्न असलेल्या कर्जाला लागू होणार नाही. या कपातीनंतर एमसीएलआर हा ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्के होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात केल्यानंतर स्टेट बँकेनेही कर्जाचे दर कमी केले आहेत.
हेही वाचा-संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक संकटात; चालू महिनाअखेर तिजोरीत होणार खडखडाट
जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला.
हेही वाचा-सणासुदीत अॅमेझोनसह फ्लिपकार्टचा 'धमाकेदार' व्यवसाय; ६ दिवसात १९ हजार कोटींची उलाढाल
बँकांकडून आकारण्यात येणार कमीत कमी व्याजदर हा आधार दर म्हणून ओळखला जातो. आधार दरावरून बँक एमसीएलआरचा वापर करतात. भांडवलासाठी लागणारा खर्च, बँकांच्या कामकाजाचा खर्च, नफा आदी निकषावरून बँकांकडून व्याजदर निश्चित केला जातो. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.