नवी दिल्ली - ईडीने अखेर कर्जबुडव्या उद्योगपतींना दणका दिला आहे. सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी या कर्जबुडव्या उद्योगपतींचे शेअर विकून 792.11 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाला हस्तांतरित केले आहेत. तर आतापर्यंत विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांची मालमत्ता जप्त करून ईडीने एकूण 13,109.17 कोटी रुपयांची रिकव्हरी केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई केली आहे.
एसबीआयचे 6,900 कोटी रुपये किंगफिशर एअरलाईन्सने बुडविले आहेत. तर पंजाबन नॅशनल बँकेचे 800 कोटी, आयडीबीआय बँकेचे 800 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 650 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे 550 कोटी रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 410 कोटी रुपये बुडविले आहेत. मल्ल्यावर 9000 हजार कोटी रुपयांची मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
पीएनबी घोटाळा प्रकरण -
नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याच्या विरोधात चौकशी करत आहे. पंजाब नॅशनल बँकेने मोदी आणि चोक्सी यांच्याविरोधात जानेवारी 2018 मध्ये फसवणुकीची तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि इतर आरोपी हे विदेश पळून जाण्यात यशस्वी ठरले. नीरव मोदीला 13 मार्च 2019 मध्ये लंडनमधून अटक करण्यात आली होती. 8 जून 2019 ला मुंबईतील विशेष न्यायालयाला निरव मोदीची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार ईडीला दिले. नीरव मोदी लंडनमधील तुरुंगात असून त्याच्या प्रत्यर्पणाला ब्रिटन सरकारने परवानगी दिली आहे. त्याला लवकरच भारतीय तपास यंत्रणांच्या हवाली करण्यात येईल. मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेल राहणार आहे तर मेहुल चौक्सी 2018 ला भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा या देशामध्ये दडून बसला होता. त्याला भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
तब्बल 36कर्जबुडवे देशातून फरार -
मागील काही वर्षात देशातून विजय मल्या, निरव मोदी आणि मेहूल चोक्सीच नाही तर त्यांच्यासारखे तब्बल 36 कर्जबुडवे देशातून फरार झाले, असा धक्कादायक खुलासा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. आगस्टा वेस्टलँड प्रकरणातील सुशेन मोहन गुप्ता या आरोपीच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली. ईडीने केलेल्या खुलाशामुळे आता देशभरात खळबळ उडालेली आहे. हे 36आरोपी कोण याबद्दल अद्याप पडदा उठलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात देशाला चुना लावून हे आरोपी पळाले आहेत, असे समजते.
हेही वाचा - नीरव मोदीला भारतात आणल्यावर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार
हेही वाचा -विजय मल्ल्यासह नीरव मोदीला ईडीचा दणका; ९३७३ कोटी रुपयांची मालमत्ता बँकांकडे वर्ग