नवी दिल्ली - डिजिटल देयक व्यवहार करणाऱ्या पेटीएमने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी सेवा लॉंच केली आहे. ग्राहकांना नजीकच्या दुकान अथवा मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर काही दिवसानंतर पैसे देण्याची सुविधा पेटीएमने उपलब्ध करून दिली आहे. 'पेटीएम पोस्टपेड' असे या सेवेचे नाव आहे.
ग्राहकांना पोस्टपेडच्या सेवेचा रिलायन्स फ्रेश, हल्दीराम, अपोलो फार्मसी व क्रोमा या ठिकाणी खरेदीत लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना दूध व किराणा सामान अशा खरेदीसाठी एटीएममधून अथवा बँकेमधून पैसे काढावे लागतात. ही गरज लक्षात घेऊन पेटीएमने पोस्टपेड सेवा दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पेटीएम पोस्टपेड सेवेसाठी कंपनीने दोन बिगर-बँकिंग कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या भागीदारीतून ग्राहकांना कर्ज दिले जाणार आहे. पेटीएमचे अध्यक्ष अमित नायर म्हणाले, की प्रत्येक पेटीएम वापरकर्त्याला कर्ज देणे, हा पेटीएम पोस्टपेडचा उद्देश आहे.
सध्याच्या महामारीच्या काळात भारतीयांच्या पाठीशी उभे राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा खरेदी करण्याची सुविधा देत आहोत, असे नायर यांनी सांगितले. ग्राहकांना या सेवेमधून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची खरेदी करता येणार शक्य आहे.