नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी मारुती सुझुकीने नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये फेस शील्ड आणि मास्क अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे.
मारुतीने चारचाकी आणि वैयक्तीक स्वच्छतेसाठी बाजारात आणलेली उत्पादने दहा रुपये ते 650 रुपये किमतीत उपलब्ध आहेत. यामध्ये त्रिस्तरीय फेस मास्क, डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल, शो कवर, हातमोजे आणि फेस शील्ड यांचा समावेश आहे.
याशिवाय मारुतीने वाहनाच्या इंटेरियरसाठी व केबीनच्या पार्टिशनसाठी उत्पादने उपलब्ध केली आहेत. ग्राहकांना ही उत्पादने डीलरशिपकडून अथवा वेबसाईटवर चौकशी करून मिळविता येतील, असे मारुती सुझुकीने म्हटले आहे. ग्राहकांचा विश्वास वाढीला लागावा, यासाठी 'आरोग्य आणि स्वच्छता' या श्रेणीत अनेक उत्पादने उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही मारुती सुझुकीने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे मारुती-सुझुकीला वाहन विक्री व्यवसायात मोठा फटका बसला आहे. मारुतीच्या वाहनांच्या विक्रीत मेमध्ये गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत 86 टक्के घसरण झाली आहे.