नवी दिल्ली - रिलायन्स जिओने तीन वर्षातच सर्वात मोठी दूरसंचार कंपनी होण्यात यश मिळविले आहे. जिओचे देशात ३३.१३ कोटी ग्राहक झाले आहेत. तर व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची जूनपासून संख्या कमी झाली आहे.
गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये जूनपर्यंत ३३.१३ कोटी ग्राहक असल्याची कंपनीने माहिती दिली. मुकेश अंबांनी यांची मालकी असलेल्या जिओने भारती एअरटेलला मे महिन्यात मागे टाकले आहे. त्यानंत जिओ दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी झाली. तेव्हा जिओचा दूरसंचार बाजारपेठेमध्ये २७.८० हिस्सा होता. तर एअरटेलचा २७.६ टक्के हिसा होता.
जिओच्या ग्राहकांची संख्या वाढत असतानाच व्होडाफोन-आयडिया ग्राहकांची संख्या ३३४.१ दशलक्षावरून ३२० दशलक्ष एवढी घसरली आहे. रिलायन्सच्या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युअलर या परस्पर स्पर्धक कंपन्यांनी विलिनीकरण केले होते. त्यानंतर व्होडाफोन आयडिया ही ४० कोटी ग्राहक असलेली देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झाली होती. तरीही जिओचा दूरसंचार बाजारपेठेतील हिस्सा वाढत गेला. तर प्रत्येक महिन्याला व्होडाफोन आयडियाचे ग्राहक कमी होत आहेत. कमीत कमी रिचार्ज न केल्याने व्होडाफोन आयडिकाकडून ग्राहकांना मेसेज पाठविण्यात येत आहेत.