नवी दिल्ली - आर्थिक डबघाईमुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी थेट केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयासमोरच आज निदर्शने केली. केंद्र सरकारने जेट एअरवेजला वाचवावे, अशी अशी मागणी यावेळी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी जेट एअरवेजचे सुमारे ५०० कर्मचारी उपस्थित होते.
जेट एअरवेजच्या एका कर्मचाऱ्याने ईटीव्ही भारतशी बोलताना फेब्रुवारीपासून पगार मिळाला नसल्याचे सांगितले. ईएमआय थकल्याचे सांगत कर्ज फेडण्याची चिंता असल्याचेही या कर्मचाऱ्याने सांगितले. जेट एअरवेजचे सुरक्षा विभागाचे कर्मचारी पुष्पेंद्र सिंग म्हणाले, माझ्या एसबीआय क्रेडिट कार्डची मर्यादा १ लाख ३० हजार रुपये आहे. हे सर्व पैसे वापरले आहेत. जर एसबीआयने जेटएअरवेजला कर्ज दिले नाही,तर मी क्रेडिट कार्डचे पैसे देणार नाही.
माधवी या जेट एअरवेजमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत आहेत. त्यांनी जेट एअरवेज बंद पडण्यामागे एसबीआयला दोष दिला. त्या म्हणाल्या, जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर एसबीआयने कंपनीला १ हजार ५०० कोटींचा हंगामी निधी देण्याचे जाहीर केले होते. मात्र गोयल यांच्या राजीनाम्यानंतर एसबीआयने कर्ज देण्यास नकार दिला आहे.
जेट एअरवेजने १७ एप्रिलपासून सर्व विमान सेवा तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या निर्णयानंतर जेटच्या १६ हजार कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी शोधावी लागत आहे.