मुंबई – एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळविणारे अधिकारी ठरले आहेत. त्यांना आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये वेतनांसह 18.92 कोटी रुपयांचे भत्ते मिळाले आहेत.
आदित्य पुरी यांनी एचडीएफसी बँकेला खासगी क्षेत्रातील सर्वाधिक मालमत्ता असलेली बँक म्हणून नावारुपाला आणले आहे. पुरी यांना एचडीएफसी बँकेचे 161.56 कोटी रुपयांचे अतिरिक्त शेअर मिळाले आहेत. वयाच्या 70 व्या वर्षी पुरी हे ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार आहेत.
पुरी यांना दोन वर्षांचा बोनस देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांचे चालू वर्षात एकत्रित वेतन हे 38 टक्क्यांनी वाढले आहे. हा अतिरिक्त बोनस वगळल्यास पुरी यांचे सुमारे 20 टक्क्यांनी वेतन वाढल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आयसीआयसीआय बँकेचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप बक्षी यांना बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे वेतन मिळते. त्यांना वार्षिक 6.31 कोटी रुपयांचे वेतन मिळत असल्याचे बँकेने वार्षिक अहवालात म्हटले आहे.
अक्सिस बँकेचे प्रमुख (रिटेल) प्रलय मंडल हे बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळविण्यात दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी ठरले आहेत. त्यांना मागील आर्थिक वर्षात वेतन व भत्त्यांसह 1.83 कोटी रुपये मिळाले होते. कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांचा कोटक महिंद्रात 26 टक्के हिस्सा आहे. त्यांनी स्वत:हून वेतनात 26 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.