मुंबई - देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या जिओमध्ये गुगल 7.6 टक्के हिस्सा घेणार आहे. त्यासाठी गुगल रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 हजार 737 कोटी रुपये देणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी वार्षिक सभेत दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, की जिओमध्ये रणनीतीचे गुंतवणूकदार म्हणून आम्ही गुगलचे स्वागत करत आहोत. गुगलच्या गुंतवणुकीनंतर जिओमधील निधी मिळविण्याचा टप्पा पूर्ण होणार आहे. गेल्या तीन महिन्यात रिलायन्सने जिओच्या माध्यमातून 2,12,809 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. विशेष म्हणजे जिओमध्ये गुगलची स्पर्धक असलेल्या फेसबुकनेही 10 टक्के हिस्सा घेतला आहे.
ब्रिटनची बीपी कंपनीची गुंतवणूक आणि राइट्स इश्शूच्या माध्यमातून रिलायन्सने 53 हजार 124 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. कंपनीवर आर्थिक वर्ष 2019-20अखेर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते. सध्या कंपनी कर्जमुक्त झाली आहे. कंपनीने कर्जमुक्तीचे उद्दिष्ट मार्च 2021पर्यंत ठेवले होते. त्यापूर्वीच कंपनीने हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली असल्याने व्यवसाय विस्तार करताना कंपनीला मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे, चेअरमन अंबानी यांनी सांगितले.