नवी दिल्ली – ग्लेनमार्क कंपनीने कोरोना महामारीच्या संकटात दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फॅबीफ्ल्यू औषधाची किंमत कंपनीने 103 रुपयांवरून 75 रुपये एवढी कमी केली आहे.
ग्लेनमार्क फार्माचे उपाध्यक्ष आलोक मलिक म्हणाले, की रुग्णांना परिणामकारक औषधे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य आहे. जगात इतर देशात मिळणाऱ्या फॅविपिरॅवीरच्या तुलनेत देशातील फॅबीफ्ल्यूची किंमत सर्वात कमी असल्याचे अंतर्गत संशोधनातून दिसून आले आहे. औषधाची किंमत आणखी कमी झाल्यास देशातील जास्तीत जास्त रुग्णांना प्रमाणात फॅबीफ्ल्यू मिळणे शक्य होणार आहे.
भारतात फॅबीफ्ल्यूची एक गोळी 75 रुपयांना आहे. तर रशियात प्रति गोळी 600 रुपये, बांग्लादेशात 350 रुपये, जपानमध्ये 378 रुपये तर चीनमध्ये 215 रुपये अशी गोळीची किंमत आहे. ग्लेनमार्क कंपनीने देशातील संशोधन आणि विकास केंद्रातून औषधी द्रव्यांचे क्रियाशील घटक तयार करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कंपनी ही औषधांच्या उत्पादनासाठी व कच्च्या मालासाठी स्वयंपूर्ण आहे.