नवी दिल्ली - राष्ट्रहित विरोधी कारवाया करत असल्याचा आरोप असलेली चीनी कंपनी बाईटडान्स कंपनी अखेर सरकारपुढे झुकली आहे. कंपनीने टिक टॉक आणि हॅलो या सोशल मीडिया अॅपमधील वापरकर्त्यांचा डाटा देशातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशात डाटा सेंटर करण्यासाठी पर्यायाचा शोध सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
केंद्र सरकारने टिक टॉक आणि हॅलो अॅपशी निगडीत २४ प्रश्न उपस्थित करत बाईटडान्स कंपनीला नोटीस पाठविली होती. सोशल अॅपमधून कंपनी राष्ट्रहितविरोधी कामे करत असल्याचे सरकारने नोटीस म्हटले होते. कंपनीने २२ जूलैपर्यंत योग्य प्रतिसाद दिला नाही, तर सोशल मीडिया अॅपवर बंदी घालण्यात येईल अशा इशाराही सरकारने नोटीसमधून दिला होता.
काय म्हटले आहे बाईटडान्स कंपनीने ?
भारत सरकार डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी कायदा आणत आहे. त्यादृष्टीने आम्ही महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. देशात डाटा सेंटर करण्यात येणार आहे. भारतीय वापरकर्त्यांचा डाटा विश्वसनीय सेवांमधून देशातच सुरक्षित राहील, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या, देशातील वापरकर्त्यांचा डाटा हा तृतीय पक्ष असलेल्या सिंगापूर आणि अमेरिकेतील डाटा सेंटरमध्ये ठेवण्यात आलेला आहे.
टिकटॉक सतत पडलेय वादाच्या भोवऱ्यात-
अश्लील आणि चुकीची माहिती पसरविल्याने मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवर बंदी घातली होती. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी लोकसभेतील शून्य प्रहरात टिक टॉक हे बेकायदेशीर माहिती गोळा करून चीनमध्ये पाठवित असल्याचे म्हटले होते. तसेच ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून टिक टॉक आणि हॅलो अॅप हे राष्ट्रविरोधी कृत्य करत असल्याचे म्हटले होते. तसेच अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. हे आरोप टिक टॉकने फेटाळून लावले आहेत.