नवी दिल्ली - झोमॅटोसह ईजीडिनर आदी ऑनलाईन कंपन्या ग्राहकांना घरपोहोच अन्न देताना भरघोस सवलती देत आहेत. त्यामुळे व्यवसायात तग धरणे कठीण झाल्याने राजधानीमधील ३०० हून अधिक हॉटेल एकत्रित आले आहेत. त्यांनी नॅशनल रॅरस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) छत्राखाली 'लॉगआऊट कॅम्पेन' हा हॅशटॅग गुरुवारी सुरू ठेवला.
हॉटेल व्यावसायिक त्यांच्या हॉटेलची नावे हॉटेल झोमॅटो गोल्ड, इझीडिनर, डाईनआऊट गारमेट पासपोर्ट, निअरबायच्या यादीमधून काढत आहेत. या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात भरघोस सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना सवलतींची सवय लागत असल्याचे एनआरएआयचे अध्यक्ष राहुल सिंह यांनी सांगितले.
झोमेटोने आणली अमर्यादित थाळी-
गेल्या महिन्यात झोमॅटोने गोल्ड ही सेवा घेणाऱ्यांना अमर्यादित थाळी ही सेवा आणली आहे. यामधून ग्राहकांना अमर्यादित जेवण देण्यात येणार आहे. त्यासाठी झोमॅटोने दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील ३५० हून अधिक रेस्टॉरंटबरोबर करार केला आहे.
डीपीआयआयटीकडून वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न-
गेल्या महिन्यात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) प्रतिनिधींनी झोमॅटो आणि स्विग्गी कंपन्यांना निर्देश दिले होते. ऑफलाईन हॉटेल उद्योगाबरोबरील मतभेद दूर करावे, असे निर्देशात म्हटले होते.
ऑनलाईन फूड कंपन्या त्यांच्याकडील तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांची आवड समजून घेतात. त्याप्रमाणे स्वत: मेनू तयार करून मोठ्या सवलतीत विक्री करतात. ऑनलाईन फुड कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सरकारने सहकार्य करावे, अशी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे.