नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या संकटात निमान कंपन्यांमध्ये पुन्हा वेतन कपात सुरू झआली आहे. इंडिगो आणि विस्ताराने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले आहे.
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा ई-मेल ईटीव्ही भारतने मिळविला आहे. यामध्ये कंपनीने म्हटले, की 1 जूलै 2020 पासून साडेपाच दिवस हे विनावेतनाचे असणार आहेत. तर एकूण दहा दिवस हे विनावेतनाचे असणार आहेत. प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याबाबत एचआर टीमशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे.
इंडिगोच्या प्रवक्त्याने ईटीव्ही भारतला सांगितले, की मार्च व एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देणाऱ्या जगभरातील विमान कंपनीपैकी इंडिगो ही एक कंपनी आहे. वैमानिकांना विनावेतन सुट्टी ही तात्पुररती उपाययोजना आहे. विस्तारा एअरलाईन्स कंपनीनेही पुढील सहा महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5 ते 20 टक्के कपात केली आहे. ही कपात 40 टक्के कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. कंपनीचे सीईओ लेस्ली थँग यांचे वेतन हे जूलै ते डिसेंबरदरम्यान 20 टक्क्यांनी कमी होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विस्ताराचे वरिष्ठ अधिकारी व व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या वेतनात दरमहा 15 टक्के कपात होणार आहे. कंपनीच्या 60 टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार नसल्याचे विस्ताराने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 23 मेपासून देशांतर्गत विमान सेवेला परवानगी दिली आहे. मात्र, ठराविक मार्गांवरच विमान सेवेला परवानगी आणि विमान इंधनाचे वाढलेले दर या कारणांनी विमान कंपन्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.