नवी दिल्ली – चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक केलेल्या कुरापतीखोर वागणुकीचा अखिल भारतीय व्यापारी संघटेनेने (सीएआयटी) निषेध केला आहे. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या 450 उत्पादनांवर व्यापारी संघटनेने बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
चीनी उत्पादनांची बहिष्कारातून डिसेंबर 2021 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या वस्तुंची आयात कमी करण्याचा उद्देश आहे. सध्या, भारत चीनमधून 5.25 लाख कोटी रुपयांच्या वस्तुंची आयात दरवर्षी करतो. सीएआयटीने पहिल्या टप्प्यात 500 श्रेणीतील 3 हजार उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही उत्पादने कमी खर्चात देशात तयार होवू शकतात. तरीही या उत्पादनांची चीनमधून आयात करण्यात येते. त्या वस्तुंच्या उत्पादनासाठी कोणतेही तंत्रज्ञान लागत नाही. जरी तसे तंत्रज्ञान लागत असले तरी आपल्याकडे तसे तंत्रज्ञान आहे. स्वदेशी जागरण मंचकडून चीनी उत्पादनांवर बंदीची मागणी
पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर देशभरात चीनबद्दल संतापाची लाट उसळली आहे. चीनच्या कंपन्यांना देशांमधील कंत्राटांत सहभागी होण्यापासून रोखावे, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे.
भारतीयांनी चीनी उत्पादनाची खरेदी थांबवावी, असे स्वदेशी जागरण मंचने आवाहन केले आहे. तसेच चीनच्या वस्तुंवर अतिरिक्त कर लावावा, अशी मागणीही मंचाने केली आहे. मंचाचे समन्वयक अश्विनी महाजन म्हणाले, भारतीय कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी चीनी उत्पादनांची जाहिरात करू नये, असे आवाहन आहे. ही परमोच्च बलिदान करणाऱ्या सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि चीनच्या ऑटो कंपनीमध्ये झालेला करार रद्द करावा, अशी महाजन यांनी मागणी केली.