नवी दिल्ली - कोरोना महामारीचा खनिज तेल बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. या आर्थिक नुकसानीमुळे ब्रिटिश पेट्रोलियमने 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांना वर्षभरात कामावरून कमी केले जाणार आहे.
जगभरात कंपनीचे 70 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 15 टक्के कर्मचारी कमी केले जाणार आहेत. ब्रिटिश पेट्रोलियमचे सीओ बर्नार्ड लूने यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीच्या स्थितीविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, जगभरात खनिज तेलाची मागणी कमी होत असताना कर्मचारी कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्हाला तर हे माहीत आहे, हे मानवावरील खूप मोठे संकट आहे. आपल्या कंपनीवर आणि उद्योगावर मोठे संकट आहे.
कंपनीचा रोज लक्षावधी डॉलर खर्च होत आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीवर आठ अब्ज डॉलरचे कर्ज झाले आहे.
ब्रिटिश पेट्रोलियमचा देशातील विविध कंपन्यांमध्ये हिस्सा आहे. या कंपनीत सुमारे 7 हजार 500 कर्मचारी देशात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी ब्रिटिश पेट्रोलियमने रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर किरकोळ विक्रीसाठी करार केला आहे.