नवी दिल्ली - दुचाकी कंपनी बजाजने 'नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी ओळख असलेली 'चेतक' स्कूटर पुन्हा लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक चेतकचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झाले. या ई- स्कूटरचे पुण्यातील चाकणच्या कारखान्यातून उत्पादन घेतले जाणार आहे.
चेतक ई-स्कूटरची युरोपमधील बाजारपेठेत निर्यात करण्याचेही बजाजने नियोजन केले आहे. इलेक्ट्रिक दुचाकी प्रकारातही कंपनीने प्रस्थापित होण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले. ई-स्कूटरची निर्मिती केल्याने पारंपारिक स्कूटरच्या निर्मितीकडे वळलो, असा अर्थ होत नसल्याचे बजाज म्हणाले. कंपनी दुचाकींवर लक्ष केंद्रित करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा- इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कपातीचे उत्पादक संघटना एसएमईव्हीकडून स्वागत
५ तासाच्या चार्जिंगनंतर स्कूटर ९५ किमी अंतर कापते
कंपनीने चेतक ई-स्कूटरची किंमत अद्याप जाहीर केली नाही. मात्र ही किंमत १.५ लाख रुपयावरून कमी असणार आहे. ई-स्कूटर केवळ ५ तासाच्या चार्जिंगनंतर स्पोर्ट्स मोडवर ८५ किमी धावते. तर ईको मोडवर ९५ किमी धावते. वाहन उद्योगाचे भवितव्य हे पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, वाहने भंगारात काढण्याबाबतही सरकार लवकरच धोरण तयार करणार आहे. वाहने भंगारात काढण्यासाठी बंदर खुले करण्याचे सरकार नियोजन करत आहे. या वाहनांच्या भंगाराचा आंतरराष्ट्रीय बाजारात पुनर्वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानहून भारताची वाईट स्थिती : ११७ देशात १०२ वा क्रमांक
वाहन प्रवास सामायिक करणे (राईड शेअरिंग), जोडणी, स्वयंचलित मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहनात वाहन उद्योगाचे भवितव्य असल्याचे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले. वाहनांच्या इंजिनमध्ये इंटरनल कंबस्शन इंजिनऐवजी इलेक्ट्रिकचा वापर होणार आहे. त्यामुळे जगभरात वाहन उद्योग हा विस्कळीत अवस्थेत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांचे जागतिक हब होण्याची भारताने संधी सोडू नये, असेही कांत म्हणाले. यापूर्वीच भारताने चारचाकी, मोबाईल फोन, सोलर सेल आणि दूरसंचार साधनांचे जागतिक उत्पादन हब होण्याची संधी सोडल्याचे कांत म्हणाले.