सॅनफ्रान्सिस्को- तंत्रज्ञान कंपन्यांना सायबर सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही सुरक्षा भेदणाऱ्या हॅकर ग्रुपला अॅपलने २ लाख ८८ हजार ५०० डॉलर दिले आहेत. या ग्रुपने अॅपलच्या कोअर सिस्टिममधून तीन महिन्यांत धोकादायक ठरू शकणाऱ्या ५५ त्रुटी शोधल्या आहेत.
हॅकर ग्रुपने अॅपलच्या मुलभूत पायाभूत संरचनेवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. त्यामुळे ते वापरकर्त्यांचे खासगी ई-मेल, आयक्लाउड डाटा आणि इतर वैयक्तिक माहिती मिळवू शकत होते. अॅपलने त्वरित या त्रुटी दुरुस्त केल्या आहेत. या हॅकर ग्रुपमध्ये सॅम कर्री हे अॅप्लिकशन सिक्युरिटी रिसर्चचे संशोधकही होते. ते म्हणाले, की अॅपलने जर संपूर्ण पैसे दिले तर ही रक्कम ५ लाख डॉलरहून अधिक असणार आहे.
विशेष म्हणजे या हॅकरला भारतीय हॅकर भावुक जैन याच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. या भारतीय हॅकरने अॅपलचे अकाउंटची खातरजमा करताना असलेली त्रुटी (बग्ज) शोधून काढली होती. त्याबद्दल जैनला अॅपलकडून १ लाख डॉलर म्हणजे सुमारे ७५ लाख रुपये मिळाले होते. याबाबत कर्री म्हणाले, की अॅपलचा बग बाउंटी प्रोग्रॅम हा केवळ विविध उत्पादनांमधील सुरक्षेमधील त्रुटी शोधण्यासाठी दिला जातो. हे समजल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. जर अॅपलने त्रुटी दुरुस्त केली नसती तर मोठ्या प्रमाणात माहिती उघड झाली असती. त्यामधून त्यांचे मोठे नुकसान झाले असते, असा त्यांनी दावा केला.