नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक विभाग लवकरच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी) आणि रेलटेलचे आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. या दोन्ही रेल्वेच्या कंपन्या आहेत. नुकतेच रेल्वेने आणलेल्या आयआरसीटीसीच्या आयपीओला गुंतवणुकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.
रेल्वेला ब्राँडबँडची सेवा पुरविणारी कंपनी रेलटेल शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी निबंधकाची (रजिस्ट्रार) नियुक्ती करण्यात येणार आहे. रेलटेलमध्ये सरकारचा २५ टक्के हिस्सा आहे.
हेही वाचा-आयआरसीटीसीचा शेअर बाजारात दमदार प्रवेश; पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट
आयआरएफसी ही भारतीय रेल्वेला वित्तीय पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सरकारी सूत्राने सांगितले. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) या विभागाने भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाचे (आयपीओ) शेअर बाजारात आणले होते. आयआरसीटीसीला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने सरकार नव्या कंपन्यांच्या आयपीओबाबत आशावादी आहे.
केंद्र सरकारने चालू वर्षात निर्गुंतवणुकीमधून १.०५ लाख कोटी उभे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहेत. त्याचाच भाग म्हणून चालू वर्षात दहा सरकारी कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आणण्याचे सरकारने नियोजन केले आहे. आर्थिक व्यवहारावरील केंद्रीय मंत्रिमडळाच्या समितीने रेल्वेच्या पाच कंपन्यांना शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यासाठी एप्रिल २०१७ मध्ये मंजुरी दिली होती. यामध्ये इरकॉन इंटरनॅशनल, आरआयटीईस, आरव्हीएनएल, आरएफसी आणि आयआरसीटीसी यांचा समावेश आहे.
काय आहे आयपीओ-
इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) म्हणजे कंपनीने शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी आणलेल्या शेअरचे प्रारंभिक मूल्य असते. त्यासाठी कंपनीला सेबीकडून परवानगी घ्यावी लागते. तसेच कंपनीकडून लोकांसाठी माहिती जाहीर केली जाते.