नवी दिल्ली - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा ट्रॅक काढण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. अत्यंत कमी वेळात ५ कोटी जणांनी हे अॅप डाऊनलोड केल्याने हे जगातील सर्वात वेगवान अॅप ठरले आहे. ही माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.
टेलिफोनला ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ७५ वर्षे लागली आहेत. तर रेडिओला ३८ वर्षे, टिव्हीला १३ वर्षे, इंटरनेटला ४ वर्षे, फेसबुकला १९ महिने आणि 'पोकमन गो'ला १९ दिवस लागले आहेत. तर आरोग्य सेतू हे अॅप केवळ १३ दिवसात ५ कोटी लोकापर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलला जनतेला संबोधित करताना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते.
काय आहे आरोग्य सेतू अॅप?
कोरोनाची लागण झालेला व्यक्ती जवळ असल्यास वापरकर्त्याला त्याबाबत अॅपद्वारे अलर्ट पाठविण्यात येतो. जिल्हा प्रशासन, शिक्षणसंस्था आणि विविध विभागांना अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे अॅप पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत समितीच्या देखरेखेखाली विकसित करण्यात आले आहे. या कामात नीती आयोग आणि इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाचाही सक्रिय सहभाग आहे.
हेही वाचा-कोरोनाने खनिज तेलाच्या किमतीला थंडावा; अठरा वर्षात बॅरलची किमत सर्वात स्वस्त!
सूत्राच्या माहितीनुसार टीसीएस कंपनी अॅप टेस्टिंगवर काम करत आहे. तर टेक महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुप ही अॅपच्या नव्या आवृत्तीवर काम करत आहे. त्यामध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डाटा सायन्सचा समावेश असणार आहे. आरोग्य सेतूचा सर्व प्रकारच्या मोबाईलवर उपयोग होण्यावरही टेक महिंद्रा काम करत आहे. सध्या, हे अॅप केवळ स्मार्टफोनवर काम करू शकते.
हेही वाचा-कोरोनात दिलासा; मोडेंलिज कंपनी ७१ टन बिस्किटासह चॉकलेटचे करणार वाटप
दरम्यान, देशामध्ये कोरोनामुळे ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ हजार ४३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.