नवी दिल्ली - रेस्टॉरन्ट आणि ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोमध्ये वाद सुरू आहे. झालेल्या चुका दुरुस्त करू, असे झोमॅटोने म्हटले आहे. लॉग आऊट मोहीम थांबवावी, अशी विनंती कंपनीने रेस्टॉरन्ट मालकांना केली आहे.
झोमॅटोकडून ग्राहकांना मोठ्या सवलती देण्यात येत असल्याने अनेक रेस्टॉरन्ट मालक अडचणीत आले आहेत. यामुळे संतापून मोठ्या शहरांमधील १ हजार २०० रेस्टॉरन्टंनी झोमॅटोमधील नोंदणी रद्द केली. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, गोवा, पुणे, गुरगाव आणि वडोदरामध्ये रेस्टॉरन्ट चालकांनी लॉग आऊट मोहीम सुरू केले आहे. यामध्ये झोमॅटो, इझीडिनर, निअरबाय आदी फूड अॅपची नोंदणी रेस्टॉरन्टने रद्द केली आहे.
ही मोहीम विस्तार असल्याचे पाहून झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र गोयल यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले, ग्राहक व व्यावसायिकांवर मोठा परिणाम करणारी कंपनी सुरू केली. नियोजनाप्रमाणे घडले नाही. कोठेतरी आम्ही चूक केली. आम्हाला भागिदार रेस्टॉरन्टला १०० पट सहकार्य करण्याची गरज आहे. जे रेस्टॉरन्ट आणि ग्राहकांसाठी चांगले आहे, तेच झोमॅटोसाठी चांगले आहे.
झोमॅटो गोल्डमध्ये बदल करणार असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. रेस्टॉरन्टने खर्चात कपात करावी, जेणेकरून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात अन्न मिळू शकेल, असेही त्यांनी सूचविले आहे.