नवी दिल्ली - बनावट क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या प्रकाराने केवळ देशातील बँकांनीच नव्हे तर जागतिक बँकेने धास्ती घेतली आहे. आमच्याकडून कोणतेही डेबिट व क्रेडीट दिले जात नाही, असे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. अशा बनावट कार्डपासून सावधान राहण्याचा इशाराही जागतिक बँकेने दिला आहे.
देशात जागतिक बँकेच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट डेबिट व क्रेडिट कार्ड केल्याचे प्रकार समोर आले होते. या फसवणुकीच्या प्रकाराची जागतिक बँकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. जागतिक बँकेकडून कोणतेही डेबिट व क्रेडिट कार्ड दिले जात नाही. तसेच बँक ग्रुप कोणत्याही बनावट कार्डच्या निर्मितीत नाही. अशा फसवणुकीच्या प्रकारापासून जनतेने सावध राहावे, असा सल्ला जागतिक बँकेने मार्गदर्शक सूचनांमधून दिला आहे.
अधिक माहितीसाठी ही www.worldbank.org अधिकृत वेबसाईट आणि इतर कार्यक्रमांची माहिती पाहावी, असे जागतिक बँकेने आवाहन केले आहे.