बंगळुरू - बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांचे विलिनीकरण आजपासून अस्तित्वात आले आहे. यानंतर ही बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक झाली आहे. बँकेच्या विलिनीकरणाने कर्मचारी आणि ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तीनही बँकांच्या देशात एकूण ९ हजार ५०० हून अधिक शाखा आहेत. तर देशात १३ हजार ४०० एटीएम आहेत. तर ८५ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. या बँकांच्या शाखांमधून १२ कोटी ग्राहकांना सेवा देण्यात येते. बँकांच्या विलिनीकरणाने १२ कोटीहून अधिक नागरिकांना बँकेची उत्कृष्ट सेवा मिळेल, असा विश्वास बँक ऑफ बडोदाचे अधिकारी विरेंद्र कुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.कर्मचाऱ्यांना विविध संधीचा लाभ मिळणार आहे. ग्राहकांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. कर्मचाऱ्यांचे हितसंरक्षण अबाधित राखण्यात येणार असल्याचेही विरेंद्र कुमार यांनी सांगितले.
असा आहे बँकांचा इतिहास-
बँक ऑफ बडोदाची स्थापना २० जुलै १९०८ मध्ये झाली आहे. विजया बँकेची स्थापना कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात १९३१ मध्ये ए. बी. शेट्टी यांनी केली. देना बँक या बँकेचे नामकरण १९३८ मध्ये संस्थापक देवकरण नानजी यांच्या आद्याक्षरावरून करण्यात आले होते.