हैदराबाद - काही महिन्यांपासून मंदीच्या स्थितीला सामोरे जाणारा वाहन उद्योग ऑक्टोबरमध्ये सावरल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवासी वाहनांसह दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. असे असले तरी वाहन उद्योगाची स्थिती कोरोनापूर्वीच्या स्थितीप्रमाणे झाली नसल्याचे वाहन डीलरची संघटना एफएडीएने म्हटले आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे (एफएडीए) विनेक्ष गुलाटी म्हणाले, की गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ वाहन विक्रीचे प्रमाण कमी राहिले आहे. नवरात्रीच्या काळात ऑक्टोबरमध्ये निश्चितच वाहनांची विक्री वाढली आहे. मात्र, ही आकडेवारी देता येत नाही.
चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ-
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने ऑक्टोबरमध्ये १.६३ लाख वाहनांची विक्री केली. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकीच्या १.३९ लाख वाहनांची विक्री झाली होती. दुसऱ्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी ह्युदांईने ऑक्टोबरमध्ये ५६ हजार ६०५ वाहनांची विक्री केली. यापूर्वी २०१८ मध्ये ह्युदांईच्या ५२ हजार वाहनांची विक्री झाली होती.
दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ-
हिरो मोटोकॉर्पच्या ८ लाख मोटारसायकल आणि स्कूटरची ऑक्टोबरमध्ये विक्री झाली आहे. ही आजपर्यंत एका महिन्यातील सर्वाधिक वाहनांची विक्री आहे. बजाज ऑटोच्या दुचाकींची विक्री ऑक्टोबरमध्ये १८ टक्क्यांनी वाढून ४ लाख ७० हजार २९० आहे. बजाजच्या वाहनांची एकाच महिन्यातील ही आजपर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.