नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपच्या संस्थापकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. स्टार्टअप संस्थापकांनी संस्थांच्या विकासाबरोबर दर्जेदार उत्पादनांवर लक्ष केंद्रित करावे, असा पंतप्रधानांनी स्टार्टअप संस्थापकांना सल्ला दिला आहे. ते नॅसकॉम टेक्नॉलॉजी आणि लीडरशीप फोरम २०२१ मध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा स्टार्टअप संस्थापकांसाठी विशेष संदेश आहे. तुम्ही स्टार्टअपचे मूल्यांकन आणि त्यामधून बाहेर पडण्याच्या रणनीतीपुरते मर्यादित राहू नका. तुम्ही संस्था शतकानंतरही कार्यरत कशा राहू शकणार आहेत, त्यावर विचार करा. जागतिक दर्जाची उत्पादने करण्यावर लक्ष केंद्रित करा. हे दोन उद्दिष्टे पूर्ण करण्याबाबत तडजोड होऊ शकत नाही. देशात कल्पकतेची कमतरता नाही. फक्त कल्पकता प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शकांची आवश्यकता आहे.
हेही वाचा-व्हॉट्सअपसारख्या कंपन्यांनाही परवाना लागू करावा- सीओएआयची सरकारकडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांतील महत्त्वाचे मुद्दे
- कधी काळी देवीच्या लशीसाठी आपण विदेशावर अवलंबून होतो. आता, आपण देशात उत्पादित केलेली कोरोना लस ही विविध देशांना पुरवठा करत आहोत. कोरोनावर जगाला उपाय देऊन देशाने जगाला प्रेरणा दिली आहे.
- यापूर्वी आयटी उद्योगाला देशातील मोठ्या बाजारपेठेचा फायदा मिळू शकत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षात धोरण बदलले आहेत.
- आयटी उद्योगाने आश्चर्यजनक कामगिरी करून कोरोनाच्या काळात देशातील अर्थव्यवस्थेला प्रगतीशील ठेवण्यासाठी मदत केली आहे.
- कोरोनाच्या काळातही आयटी उद्योगाने २ टक्के वृद्धीदर अनुभवला आहे. भारतीय आयटी उद्योगाने ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. ही कौतुकास्पद कामगिरी आहे.
- डिजीटल तंत्रज्ञानामुळे काळ्या पैशांचे संकट कमी होण्यासाठी मदत झाली आहे.
- डाटा नियमानातील उदारीकरणामुळे देशातील स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
हेही वाचा-महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
दरम्यान, गतवर्षी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान लाँच केले आहे. त्यामधून भारत हा जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा घटक तयार करण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.