नवी दिल्ली - स्पाईसजेटने १२ नव्या विमान सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या विमानसेवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत.
स्पाईसजेटच्या सर्व १२ नव्या विमान सेवा रोज सुरू असणार आहेत. त्यासाठी बोईंग-८०० एअरक्राफ्ट विमानाचा वापर करण्यात येणार आहे. दिल्ली आणि औरंगाबादमध्ये ८ ऑक्टोबरपासून 'विना थांबा' विमान सेवा सुरू होणार आहे. दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-बंगळुरू मार्गावर अतिरिक्त विमान फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
स्पाईसजेटने १ एप्रिलला १४२ नव्या विमान सेवांची घोषणा केली होती. त्यामध्ये मुंबईला जोडणाऱ्या ७८, दिल्लीला जोडणाऱ्या ३० तर मुंबई-दिल्ली दरम्यान १२ विमान सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. स्पाईसजेटच्या रोज ५५० विमान फेऱ्या ६२ शहरांसाठी होतात. त्यामध्ये देशातील ५२ शहरे आणि विदेशातील १० शहरांचा समावेश आहे. स्पाईसजेटकडे ७७ बोईंग ७३७, ३० बॉम्बार्डिअर क्यू ४०० एस आणि तीन बी ७३७ फ्राईटर्स यांचा समावेश आहे.