नवी दिल्ली - वाहन उद्योगाची (ऑटो सेक्टर) टाळेबंदी आणि कोरोना महामारीत घसरलेली गाडी रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतांश वाहन कंपन्यांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये वाढ झाली आहे.
कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशातील वाहन कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असले तरी सप्टेंबरमध्ये मारुती सुझकी, एमजी मोटर्स, बजाज ऑटो आणि टोयोटो किर्लोस्कर या कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ झाली आहे.
मारुती सुझुकी -
मारुतीच्या एकूण वाहनांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये ३०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या (एमएसआय) १ लाख ६० हजार ४४२ वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहे. गतवर्षी कंपनीने सप्टेंबरमध्ये १ लाख २२ हजार ६४० वाहनांची विक्री केली होती.
टोयोटा किर्लोस्कर -
टोयोटा किर्लोस्करच्या वाहनांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली आहे. टोयोटाच्या ८ हजार ११६ वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष (विक्री आणि सेवा) नवीन सोनी म्हणाले, की आम्हाला मागणी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच डीलरमधील विश्वासही खूप वाढला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ऑर्डरचे प्रमाण १४ ते १८ टक्क्यांनी वाढले आहे. सणाच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून वाहनांची मागणी वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
बजाज ऑटो -
बजाज ऑटोच्या एकूण वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाजच्या एकूण ४ लाख ४१ हजार ३०६ वाहनांची विक्री झाली आहे. पुण्यात उत्पादन प्रकल्प असलेल्या बजाजच्या ४ लाख २ हजार ३५ वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री झाली होती. बजाजच्या वाहन निर्यातीतही सप्टेंबरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एमजी मोटर्स -
एमजी मोटर्सच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये २.७२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये २ हजार ६०८ वाहनांची विक्री केली आहे. एमजी मोटर इंडियाचे संचालक (विक्री) राकेश सिदाना म्हणाले, की एमजी मोटरच्या वाहनांसाठी ऑर्डर वाढत आहेत. मात्र, अधिकमास आणि श्राद्ध तिथी असल्याने वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.