नवी दिल्ली - सार्वजनिक वाहतूक बंद असतानाच दिल्लीसह एनसीआर भागात ओला आणि उबेरच्या चालकांनी संप केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली आहे. या वाहन चालकांनी योग्य भाडे आणि कर्जफेडीसाठी मुदतवाढ करावी, अशी सरकारकडे मागणी केली आहे.
ओला व उबेरशी संलग्न असणाऱ्या वाहनांचे चालक हे मंडीहाऊसमध्ये एकत्रित जमा होणार आहेत. या वाहन चालकांनी कर्जफेडीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. वाहनाच्या भाडे दरात वाढ करणे व वेगवान वाहनांवरील दंड रद्द करणे, अशी मागणी सर्वोदय ड्रायव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत सिंग गिल यांनी केली आहे.
वाहन चालकांच्या संपामुळे दिल्ली-एनसीआरसह ग्रेटर नोएडा, द्वारका आणि उत्तमनगरमध्ये वाहन मिळत नसल्याचे गिल यांनी सांगितले. संपामुळे दिल्ली-एनसीआर भागातील प्रवासी आणि आयआयटी जीईईच्या (मुख्य) परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गिल म्हणाले, की कोरोना महामारीत टाळेबंदी लागू केल्यामुळे वाहन चालक हे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना कर्जाचा मासिक हप्ता भरणे शक्य नाही. कर्जाचा हप्ता भरण्याची मुदतवाढ संपली आहे. बँकांकडून आमच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. कर्जाचा हप्ता भरला नाही तर बँकांकडून टोईंगने वाहन नेण्याची भीती आहे. कॅब अॅग्रिगेटर कंपन्यांकडून कमिशनमध्ये वाढ व्हावी, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. भाडे हे कॅब अॅग्रिगेटर नव्हे तर सरकारने निश्चित करावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे.