नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला ग्राहकांच्या घरातील सोने हे योजनेमधून बँकेकडे वळविण्यात मोठे यश मिळविेले आहे. सुवर्ण मुद्रिकरण योजनेकरिता (जीएमस) स्टेट बँक ऑफ इंडियाला ग्राहक आणि संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेमध्ये ग्राहकांनी बँकेकडे एकूण 13 हजार 212 किलोग्रॅम सोने ठेवले आहे.
केंद्र सरकारने सुवर्ण मुद्रिकरण योजनेत (गोल्ड मॉनिटायझेशन स्किम) ग्राहकांचे घरातील सोने अथवा दागिने बँकेत जमा करता येते. यासाठीची कालमर्यादा 1 ते 3 वर्षे, 5 ते 7 वर्षे तथा 12 ते 15 वर्षे, अशी आहे. त्यावर बँकेकडून वार्षिक व्याज देण्यात येते. या योजनेत विश्वस्त संस्थांकडूनही सोने घेण्यात येते.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष 2019-20मध्ये 3 हजार 973 किलोग्रॅम सोने ग्राहकांकडून जमा केले. या योजनेतून एकूण 13 हजार 212 किलो सोने जमा झाल्याचे स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
केंद्र सरकारने जीएमएस ही योजना नोव्हेंबर 2015मध्ये सुरू केली. घरात किंवा वापरात नसलेल्या सोन्याच्या मालमत्तेचा उत्पादक हेतूसाठी वापर व्हावा, हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सोने आयातीमुळे देशाची वाढती वित्तीय तूट कमी करणे, हा उद्देश आहे.
ग्राहकांनी वर्ष 2019-20 मध्ये 647 किलो सोने (243.91 कोटी रुपये) हे सार्वभौम सुवर्ण रोख्यातून बँकेकडे ठेवले आहे. अशा सार्वभौम सुवर्ण रोख्यांतून बँकेकडे एकूण 5 हजार 98 किलो सोने जमा झाले आहे. ही सोन्याची मालमत्ता रोख्याच्या स्वरुपात असते.
ही सुवर्ण रोख्याची योजना सरकारने 2015-16 मध्ये सुरू केली. त्यामध्ये भौतिक सोन्याऐवजी गुंतवणुकीकरिता डिजिटल सोने खरेदीला प्रोत्साहन दिले जाते.