नवी दिल्ली - देशातील कर्ज देणारी सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. ही कपात ०.५ टक्के एवढी आहे. या निर्णयाने मुदत ठेवीतून बचत करणाऱ्यांना कमी परतावा मिळणार आहे.
चलनाची अधिक असलेली तरलता, कर्जावर कमी झालेले व्याज या कारणाने बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. याची २६ ऑगस्ट २०१९ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कपात केल्यानंतर इतर बँकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.
एसबीआयने किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदर १० ते ५० बेसिस पाँईटने कमी केले आहेत. तर मोठ्या (बल्क) मुदत ठेवीवरील व्याजदर हा ३० ते ७० बेसिस पाँईटने कमी केले आहेत. बँकेत ७ ते ४५ मुदतीची ठेव असलेल्या रक्कमेवरील व्याजदर हे ५ टक्क्याऐवजी ४.५ टक्के असणार आहे. तर १ ते २ वर्षाची असलेल्या मुदत ठेवीवर १० बेसिस पाँईटने कपात केल्याने ६.७० टक्के व्याजदर मिळणार आहे. तर ५ ते १० वर्षाची मुदत ठेवीवरील व्याजदरात २५ बेसिस पाँईटने कपात केल्याने ६.२५ टक्के व्याजदर मिळणार आहे.
बचत खातेदारांना एसबीआयचा दिलासा-
बचत खात्यावर १ लाखांहून अधिक रक्कम असलेल्या ग्राहकांसाठी ३ टक्के व्याजदर कायम राहणार आहे. बचत खातेदारांचे हित लक्षात घेवून त्या व्याजदरात कपात करण्यात आलेली नाही. एसबीआयने १ मे २०१९ पासून बचत खात्याच्या ठेवीवरील व्याजदर हे रेपो दराशी संलग्न केले आहेत. आरबीआयने जुलैच्या तिमाहीदरम्यान रेपो दरात कपात केली होती. तरीही एसबीआयमध्ये १ लाखापर्यंत बचतीची रक्कम असलेल्यांना ३.५० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.