नवी दिल्ली - सर्वात मोठे चलनी मूल्य असलेली २ हजारांची नोट व्यवहारात फारशी न दिसण्यामागील कारण समोर आले आहे. गेली दोन वर्षे २ हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी लोकसभेत दिली आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी २ हजार रुपयांच्या नोटांबाबत लेखी उत्तर दिले आहे. नोटाबंदीनंतर ३,३६२ दशलक्ष नोटा ३० मार्च २०१८ पर्यंत बाजारात वितरित करण्यात आल्या आहेत. २ हजारांच्या नोटांचे संख्येमधील प्रमाण हे व्यवहारातील चलनाच्या तुलनेत ३.२ टक्के तर किमतीच्या ३७.२६ टक्के आहे.
२६ फेब्रुवारी २०२१ च्या माहितीनुसार चलनात २ हजार किमतीच्या २,४९९ दशलक्ष नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. या दिवशीपर्यंत २ हजारांच्या नोटांचे संख्येमधील प्रमाण हे २.०१ टक्के तर किमतीच्या १७.६८ टक्के आहे.
हेही वाचा-रतन टाटांची प्रितीश नंदी कम्युनिकेशन्समध्ये गुंतवणूक
नोटा छपाईबाबत आरबीआयकडून सरकारशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. लोकांची मागणी आणि व्यवहाराच्या दृष्टीने विचार करून आरबीआयकडून ठराविक चलनाच्या नोटा छापण्याबाबत निर्णय घेतला जातो. वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २ हजारांच्या नोटा छापण्यात आल्या नाहीत. अधिक मूल्य असलेल्या नोटांची साठेबाजी टाळणे आणि काळ्या पैशाला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा-मास्क व्यवस्थित घातला नाही तर प्रवाशांना विमानातून उतरवावे-डीजीसीआयचे आदेश
दरम्यान, देशात २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केल्यानंतर सरकारने २ हजारांची नोट बाजारात आणली होती. जुन्या ५०० आणि १०० हजार रुपयांच्या सर्व नोटा सरकारने बंद केल्या आहेत. त्याचबरोबर १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नव्या नोटा सरकारने चलनात आणल्या आहेत.