लंडन - ऋषी सुनक यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रिपदी निवड झाली आहे. लवकरच ते गृहसचिव प्रीती पटेल यांच्यासोबत 'चान्सलर ऑफ एक्सचेकर' या पदावर बसणार आहेत. संबंधित पदावरील मंत्र्याकडे अर्थखात्याची जबाबदारी असते.
ऋषी सुनक हे इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय वंशाचे सुनक यांच्यावर नवीन पदभार सोपवण्यात आला आहे. २०१९ मध्ये बहुमत मिळाल्यानंतर राजकीय पटलावर नवीन समीकरणांनी वेग घेतला. यानंतर पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद यांनी संबंधित पदावरून राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सुनक यांची नियुक्ती झाली आहे. याआधी ते जावेद यांच्या खालोखाल मुख्य सचिव होते. वयाच्या ३९ व्या वर्षी ते पंतप्रधानांच्या खालोखाल असणाऱ्या महत्त्वाच्या पदावर रूजू होणार आहेत.
सुनक हे रिचमंड योकशायर येथील खासदार आहेत. २०१५ साली ते कॉन्जरव्हेटीव्ह पक्षातर्फे इंग्लंडच्या संसदेत निवडून गेले होते.