नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांनी केवळ जीवनावश्यक वस्तुंसाठी व्यवहार करावा, असे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) आवाहन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात वाढत असताना व्यापाऱ्यांनी व्यवसाय करण्याआधी आरोग्याकडे लक्ष द्यावे, असेही सीएआयटीने म्हटले आहे.
सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले, की गृहमंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंची डिलिव्हरी करता येणार आहे. मात्र, दुर्दैवाने काही ई-कॉमर्स कंपन्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ काढून जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंचीही डिलिव्हरी करत आहेत.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना ३५० अंशांची घसरण, 'या' कंपन्यांचे घसरले शेअर
जर व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंचा व्यवहार केला तर त्यांच्यावर आपत्कालीन कायद्याअंतर्गत दंड ठोठावला जाणार आहे. याकडे सीएआयटीने व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे टाळेबंदीच्या काळात केवळ जीवनावश्यक वस्तुंचे व्यवहार चालणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
हेही वाचा-टाळेबंदी : आरोग्यांसह वाहन विमा भरण्याची १५ मेपर्यंत वाढविली मुदत