मुंबई - देशात १ एप्रिलपासून 'बीएस-६ इंजिन' क्षमतेच्याच वाहनांची विक्री अथवा उत्पादन करता येणार आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर १ एप्रिलपासून अंशत: वाढणार आहेत. ही माहिती सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) दिली आहे.
बीएस-६ इंजिनासाठी कमी गंधक असलेले पेट्रोल-डिझेल लागते. या इंधन प्रकल्पाच्या शुद्धीकरणासाठी इंडियन ऑईल कंपनीने १७ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याचे कंपनीचे चेअरमन संजीव सिंह यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, संपूर्ण देशात बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचा १ एप्रिलपासून वापर होणार आहे. त्यामुळे निश्चितच इंधनाचे दर वाढणार आहेत.
सध्या इंधनात ५० पीपीएम गंधकाचा वापर करण्यात येतो. त्याऐवजी १० पीपीएम गंधकाचा बीएस-६ इंधनात वापर करण्यात येतो. या गुंतवणुकीचा लगेच परतावा मिळावा असे आम्हाला अपेक्षित नाही. मात्र, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गुंतवणूक केली आहे. ज्या देशांमध्ये बीएस-६ इंधन सुरू करण्यात आले आहे, तिथे जादा दर वाढविण्यात आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीएस-६ इंधनाचे दर नेमके किती वाढणार आहेत, याची त्यांनी माहिती दिली नाही.
हेही वाचा - एजीआर शुल्काची दूरसंचार कंपन्यांवर टांगती तलवार कायम, कारण...
विविध सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांनी शुद्धीकरण यंत्रणेकरता ३५,००० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एचपीसीएल कंपनीने बीएस-६ इंधनाच्या विक्रीसाठी २६ ते २७ फेब्रुवारीपासून तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्याची विक्री १ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, बीएस-६ इंधनामधून कार्बनचे कमी उत्सर्जन होते.