मुंबई - स्थानिक न्यायालयाने पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेचा निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमसची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आरोपी थॉमसला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याची बँक खाती गोठवूनही कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी एचडीआयएलवर गुन्हा नोंदविला. त्यानंतर मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमसला शुक्रवारी अटक केली होती. पीएमसीकडून ४ हजार ३५५ कोटींचे कर्ज देताना घोटाळा झाल्याचा थॉमस याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला २८ सप्टेंबरला पत्र लिहिले होते. त्यात बँकेची सहा वर्षे वित्तीय माहिती दडवून ठेवल्याचे कबूल केले आहे. पीएमसीचे कर्ज थकविलेल्या हाउसिंग डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. या दोन्ही पिता-पुत्रांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गुरुवारी अटक केली.
हेही वाचा-पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक
पोलिसांच्या माहितीनुसार पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी एचडीआयएलला २००८ ते २०१९ मध्ये कर्ज दिले आहे. यापूर्वी एचडीआयएलने कर्ज थकवूनही कंपनीला कर्ज दिल्याने पीएमसी आर्थिक संकटात सापडली आहे.