नवी दिल्ली – सलग सतराव्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरूच आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 20 पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर हे 55 पैशांनी वाढले आहेत. या सतरा दिवसांत पेट्रोल प्रति लिटर हे 8.5 रुपयांनी, तर डिझेल हे 10.01 रुपयांनी प्रति लिटर महागले आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर 79.56 रुपयांवरून 79.76 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 78.55 रुपयांवरून 79.40 रुपये प्रति लिटर झाला आहे. ही माहिती सार्वजनिक तेल कंपन्यांनी दिली आहे.
विविध राज्यांमध्ये असलेल्या व्हॅटनुसार पेट्रोल व डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. सार्वजनिक तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर 7 जूनपासून वाढविण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या दराप्रमाणे तेल कंपन्या रोज दर निश्चित करतात. हे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. त्यापूर्वी सार्वजनिक कंपन्यांनी 82 दिवस पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. या काळात खनिज तेलाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत घसरल्या होत्या, तर टाळेबंदीमुळे देशातील पेट्रोल व डिझेलची मागणी कमी झाली होती.